चेन्नई - दोन वर्षाच्या बंदीनंतर पहिला सामना जिंकून आयपीएलमध्ये यशस्वी पदार्पण करणाऱ्या चेन्नई संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न सतावत आहे. दुखापतीमुळं केदार जाधव आयपीएलमधून बाहेर पडला असताना आणखी एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. चेन्नईचा पुढचा सामना आज कोलकाताविरुद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वीच फाफ डू प्लेसिसच्या फिटनेसमुळं महेंद्र सिंग धोनीचे टेन्शन वाढलेय.
माध्यमांच्या वृत्तानुसार, फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाहेर होऊ शकतो. फाफ डू प्लेसिसच्या मांसपेशी खेचल्या गेल्याने तसेच बोटामध्ये छोटा फ्रॅक्चर आहे त्यामुळं तो कोलकाताविरोधच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. चेन्नईचे फलंदाजीचे कोच मायकेल हसीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हसी म्हणाला की, कोलकाताविरोधातील सामना फाफ डू प्लेसिस खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र मोहालीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात उतरेल. ते पुढे णाले, मला वाटते डू प्लेसिस पूर्णपणे सराव सामन्यात भाग घेत नाहीये. मांसपेशी खेचल्या गेल्यात तसेच त्याच्या बोटालाही फ्रॅक्चर झालेय. पुढील आठवड्याभरात तो सराव सुरु करेल.
केदारच्या जागी डेविड विलीची निवड -
इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू डेविड विलीला चेन्नई संघाने केदार जाधवच्या जागेवर करारबद्ध केलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा लिआम प्लंकेटनंतर डेविड विली यॉर्कशायरचा दुसरा खेळाडू आहे. डेविड विली कांऊटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरकडून खेळत आहे. यॉर्कशायरने ट्विट करत डेविड विलीच्या आयपीएलमधील सहभागाला दुजोरा दिला आहे.
डेविड विली डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याचप्रमाणे गगनचुंबी षटकार मारण्यातही तो पटाईत आहे. आयपीएलच्या लिलावत डेविड विली अनसोल्ड राहिला होता. त्याची बेसप्राईज दोन कोटी रुपये होती. डेविड विली आयपीएलमध्ये भाग घेणारा इंग्लडचा 12 खेळाडू ठरला आहे. डेविड विलीने आतापर्यंत इंग्लडंकडून 20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय काही सामन्यात सलामीची भूमिकाही बजावली आहे.
दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सलामीच्या लढतीत केदार चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. पण स्नायूंच्या दिखापतींमुळे तो जखमी निवृत्त झाला होता. पण जेव्हा चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो बाद झाला, त्यानंतर अखेरच्या षटकात केदार फलंदाजीला आला होता. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.केदारला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याला जवळपास दीड ते दोन महिने खेळता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलला त्याला मुकावे लागणार आहे.