बंगळुरु - महेंद्रसिंग धोनीच्या निर्णायक आणि आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ बंगळुरूवर पाच विकेट्स राखून विजय मिळवू शकला. धोनीने 34 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 70 धावा बनविल्या. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. सामना संपल्यानंतर अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीला यशाचा मंत्रच सांगितला आहे.
धोनी सामन्यानंतर म्हणाला की, क्षेत्ररक्षणावेळी किती षटके बाकी राहिली आहेत हे आपल्या डोक्यात सतत राहिले पाहिजे. अखेरच्या षटकांत (डेथ ओव्हर) कोण गोलंदाजी करणार? त्याचप्रमाणे आपण ज्या गोलंदाजाच्या हातात चेंडू देणार आहे तो खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकतो याचा अंदाज बांधणे तितकेच महत्वाचे आहे. खेळामध्ये जय आणि पराभव असतोच. पण आपण निर्णय कसा घेतो त्यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असतो असे धोनीने सामन्यानंतर सांगितले.
दरम्यान, काल झालेल्या सामन्यानंतर विराट कोहलीच्या काही निर्णयावरुन त्याच्यावर टीका करण्यात आली होती. चहलचा वापर विराट कोहलीने डेथ ओव्हरमध्ये करायला हवा होता. ज्यावेळी धोनी फलंदाजी करत होता त्यावेळी चहलला गोंलदाजी द्यायला हवी होती. धोनी लेग स्पिनरला खेळताना अडखळत असल्याचे पहायला मिळाले. जर विराट कोहलीने चहलचा वापर शेवटच्या पाच षटकांमध्ये केला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता असे काही जणांचे मत आहे. फलंदाजी स्टाईल पाहून आपण आपली गोलंदाजीची रणनीती तयार करायला हवी. विराटने काल झालेल्या चुकातून शिकायला हवे असे काही जणांचे मत होते.
दरम्यान, काल झालेल्या सामन्यात धोनीनं पुन्हा एका आपण बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले. 34 चेंडूत सात षटकारांची आतषबाजी करत धोनीनं 74 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना धोनीने गाजवला. चेन्नईनं या सामन्यात बंगळुरुवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. धोनी आणि रायुडूच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने विजय खेचून आणला.