पुणे : मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज विजयी मार्गावर परतण्यासाठी सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल. दिल्ली गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असले, तरी त्यांनी आपल्या गत सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाताला ५५ धावांनी लोळवून प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात विजयी मार्गावर परतलेले दिल्लीकर चेन्नईविरुद्ध शानदार विजय मिळवण्याच्या उद्देशाने खेळतील. दिल्लीपुढे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचे आव्हान असेल, तर चेन्नई मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. गुणतालिकेचा विचार करता, दिल्ली तळाच्या स्थानी असून अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामन्यांत विजयी कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, चेन्नई दुसऱ्या स्थानी असून आत्मविश्वास मिळवण्यासाठी त्यांना दिल्लीविरुद्ध विजय आवश्यक आहे.केकेआरविरुद्ध ९३ धावांची विजयी खेळी केलेल्या कर्णधार श्रेयसवर दिल्लीची मुख्य मदार असेल. त्याचबरोबर युवा पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कॉलीन मुन्रो यांच्याकडूनही दिल्लीला अपेक्षा असतील. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात येत असलेले अपयश मॅक्सवेलसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्याचवेळी, केकेआरविरुद्ध संघाबाहेर बसविण्यात आलेला गौतम गंभीर चेन्नईविरुद्ध खेळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. चेन्नई संघ शानदार फॉर्ममध्ये असून त्यांच्या संघात एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अंबाती रायुडू जबरदस्त फॉर्ममध्ये असून वॉटसन, ब्राव्हो यांच्या आक्रमकतेपासूनही दिल्लीच्या गोलंदाजांना सांभाळून राहावे लागेल. त्यात गेल्या काही सामन्यांपासून झुंजणारा सुरेश रैनाही फॉर्ममध्ये आला असून त्याने मुंबईविरुद्ध नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी केली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विजयी मार्गावर परतण्यास चेन्नई उत्सुक, आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध लढणार
विजयी मार्गावर परतण्यास चेन्नई उत्सुक, आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध लढणार
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज विजयी मार्गावर परतण्यासाठी सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:16 AM