Join us  

चौकार खेचून चेन्नईला जिंकवणाऱ्या केदारच्या जागी धोनीनं 'या' खेळाडूला निवडलं!

चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 1:10 PM

Open in App

चेन्नई : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत चौकार मारत चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत तो खेळणार नसल्याने चेन्नईच्या संघाला मोठा धक्का मानला जातोय. पण चेन्नईने केदार जाधवच्या जागी बदली खेळाडू म्हणून इंग्लडंच्या खेळाडूला संघात घेतलं आहे. 

इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू डेविड विलीला चेन्नई संघाने केदार जाधवच्या जागेवर करारबद्ध केलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा लिआम प्लंकेटनंतर डेविड विली यॉर्कशायरचा दुसरा खेळाडू आहे. डेविड विली कांऊटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरकडून खेळत आहे. यॉर्कशायरने ट्विट करत डेविड विलीच्या आयपीएलमधील सहभागाला दुजोरा दिला आहे. 

 

डेविड विली डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याचप्रमाणे गगनचुंबी षटकार मारण्यातही तो पटाईत आहे. आयपीएलच्या लिलावत डेविड विली अनसोल्ड राहिला होता. त्याची बेसप्राईज दोन कोटी रुपये होती. डेविड विली आयपीएलमध्ये भाग घेणारा इंग्लडचा 12 खेळाडू ठरला आहे. डेविड विलीने आतापर्यंत इंग्लडंकडून 20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय काही सामन्यात सलामीची भूमिकाही बजावली आहे. 

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सलामीच्या लढतीत केदार चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. पण स्नायूंच्या दिखापतींमुळे तो जखमी निवृत्त झाला होता. पण जेव्हा चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो बाद झाला, त्यानंतर अखेरच्या षटकात केदार फलंदाजीला आला होता. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.केदारला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याला जवळपास दीड ते दोन महिने खेळता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलला त्याला मुकावे लागणार आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स