बंगळरु : एबी डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद करता आली. किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्यांना ब्रेंड मॅक्लुलमच्या रुपात पहिला धक्का बसला. मॅक्लुलमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी' कॉक आणि विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी केली. कोहली आता मोठी खेळी साकारणार असे वाटत होते, पण युवा फिरकीपटू मुजीव उर रेहमानने कोहलीचा अप्रतिम त्रिफळा उडवला. बंगळुरुसाठी हा मोठा धक्का होता. कोहलीने चार चौकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.
कोहली बाद झाल्यावर डी' कॉक आणि एबी डी'व्हिलियर्स ही दक्षिण आफ्रिकेची जोडी मैदानात होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचली. आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्सने दमदार षटकार लगावत मोहित शर्माचे स्वागत केले, मोहितचा हा सामन्यातील पहिलाच चेंडू होता. च्या पहिल्या षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी 16 धावा लूटल्या. बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अश्विनने क्विंटन डी' कॉकला बाद केले, त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सर्फराझ खानला तंबूत धाडले. डी' कॉकने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 45 धावा केल्या. डी' कॉक बाद झाल्यावर डी'व्हिलियर्सने बंगळुरुचा डाव सावरला. सतराव्या षटकात मुजीब उर रेहमानला डी'व्हिलियर्सचे सलग दोन षटकार लगावले आणि सामना बंगळुरुच्या बाजूने झुकवला. डी'व्हिलियर्सने अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले. बंगळुरुला 12 धावांत 10 धावांची गरज होती. बंगळुरुला 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्स बाद झाला. त्याने 40 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या. डी'व्हिलियर्सनंतर मनदीप संघाला सावरेल असे वाटत होते, पण त्याने धावचीत होत आत्मघात केला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने चार चेंडूंत 9 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बंगळुरुने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि लोकेश राहुलने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. पहिल्याच षटकात राहुलने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 16 धावांची वसूली केली. त्यावेळी राहुलने पहिल्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावल्याची आठवण आली. पण राहुलला या सामन्यात जलद अर्धशतक पूर्ण करता आले नाही. राहुलबरोबर पंजाबचा दुसरा सलामीवीर मयांक अगरवालही चांगल्याच फॉर्मात होता. त्यानेही झटपट तीन चौकार लगावले. राहुल आणि मयांक दोघेही आता पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढणार, असे वाटत होते. पण उमेश यादवचे चौथे षटक पंजाबसाठी सर्वात वाईट ठरले. कारण या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेशने मयांकला बाद केले, यष्टीरक्षक क्विंटन डी'कॉकने त्याचा अप्रतिम झेल टीपला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उमेशने आरोन फिंचला पायचीत पकडले, फिंचला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. उमेशने या षटकाच्या सहाव्या चेंडूवर युवराज सिंगला ज्यापद्धतीने त्रिफळाचीत केले, ते नजरेचे पारणे फेडणारे होते.
एका षटकात तीन फलंदाज बाद झाल्यावरही राहुलने आपल्या फटक्यांना मुरड घातली नाही. राहुलने करुण नायरला साथीला घेत धावांची भर घालण्याचे काम सुरुच ठेवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. राहुल दमदार फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढत होता. तो झटपट अर्धशतक झळकावेल, असे वाटले होते. पण वॉशिंग्टन सुंदरने राहुलला सर्फराज खानकरवी झेलबाद केले. राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने चांगली फलंदाजी केली आणि धावफलक हलता ठेवला. अश्विन दमदार फलंदाजी करत होता. अश्विनने 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचला. पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला त्यानंतरच्या चेंडूवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.