नवी दिल्ली - पृथ्वी शॉने सोमवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वी शॉने रिषभ पंतचा विक्रम मोडीत काढला आहे.
पंजाबने दिल्लीचा चार धावांनी पराभव केला पण युवा फंलदाज पृथ्वीने पदार्पण करत विक्रम केला आहे. आयपीएलमधील सर्वात तरुण सलामीवीर होण्याचा विक्रम पृथ्वी शॉच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता. पृथ्वी शॉने 18 वर्ष 165 व्या दिवशी आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण केले आहे. रिषभ पंतने 2016 मध्ये 18 वर्ष 212 दिवस झाले होते त्यावेळी सलामीवीर म्हणून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने छोटी पण आकर्षक खेळी केली. पृथ्वीने 10 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली.
काल झालेल्या सामन्यात पंजाबने दिल्लीचा चार धावांनी पराभव केला. पंजाबने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी दिलेले 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 139 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून श्रेयसने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. श्रेयसने 45 चेंडूंच पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 57 धावांची खेळी साकारली.