चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण धोनीला झालेली पाठिची दुखापत चांगलीच बळावलेली आहे. त्यामुळे या पुढच्या आयपीएलच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. धोनीने या दुखापतीनंतर चेन्नईच्या सरावामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे धोनी आगामी सामन्यात खेळणार नाही, असे म्हटले जात आहे.
चेन्नईचा यापुढील सामना राजस्थान रॉयल्सबरोबर 20 एप्रिलला (शुक्रवारी) रंगणार आहे. या सामन्याचा सराव करण्यासाठी चेन्नईचा संघ गुरुवारी मैदानात उतरला होता. त्यावेळी धोनी हा सराव करण्यासाठी मैदानात उपस्थित नव्हता. त्यामुळे धोनी पुढच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली. याबाबत संघ व्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ही स्पर्धा अजून महिनाभर रंगणार आहे. त्यामुळे धोनीची दुखापत जर गंभीर असेल तर त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. धोनी जर खेळला नाही, तर सुरेश रैनाकडे संघाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.
किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीने कडवी झुंज दिली. धोनीने अखेरच्या षटकापर्यंत पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग केला, पण यामध्ये त्याला यश मिळाले नाही. या खेळीदरम्यान धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. त्यानंतर धोनीवर मैदानात वैद्यकीय उपचार करण्यात आले होते.