नवी दिल्ली : आयपीएलध्ये दोन वर्षांच्या बंदीनंतर यावेळी चेन्नई सुपर किंग्ज हा संघ दाखल झाला आहे. महेंद्रिसिंग धोनीकडेच या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. संघातील काही सदस्यांना हा विश्वास वाटत आहे की, धोनी पुन्हा एकदा चेन्नईला जेतेपद मिळवून देईल.
धोनीच्या नेतृत्वाखाली पूर्वीही चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. धोनीने फक्त सामने जिंकले नाहीत, तर सामने जिंकवणारे खेळाडूही घडवले. चेन्नईच्या संघात खेळण्यापूर्वी काही खेळाडूंची क्रिकेट जगताला ओळखही नव्हती, पण धोनीने त्यांच्याकडून अशी काही कामिगरी करून घेतली की क्रिकेट विश्वालाही त्यांची दखल घ्यावी लागली.
चेन्नईच्या संघातील बद्रीनाथ म्हणाला की, " चेन्नईच्या संघाची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे धोनी. धोनीचे नेतृत्व साऱ्यांनीच पाहिले आहे. युवा खेळाडूंना शोधून त्यांच्याकडून चांगली कामिगरी करवून घेण्याचे कसब धोनीकडे आहे. मनप्रीत गोनी, मोहित शर्मा, इश्वर पांडे या खेळाडूंना धोनीने घडवले आहे. त्यामुळे दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करताना धोनी चेन्नईला जिंकवून देईल, "
बद्रीनाथबरोबर भारताचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीलाही धोनी चेन्नईला जेतेपद जिंकवून देईल, असे वाटत आहे. तो म्हणाला की, " परिस्थिती कशी हाताळायची, हे सर्वात जास्त कुणाला माहिती असेल तर त्याचे नाव आहे धोनी. कारण आतापर्यंत धोनीने वाईट परिस्थितीतूनही संघाला जिंकवून दिले आहे. दोन वर्षांनी तो आपल्या जुन्या घरात परतला आहे. त्यामुळे त्याचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. त्यामुळे यावर्षी आयपीएलचे जेतेपद धोनी चेन्नईला मिळवून देईल, असा विश्वास मला आहे."