कोलकाता - आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या दिल्ली आणि कोलकाता सामन्यामध्ये दिनेश कार्तिकने धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कार्तिकने 156 व्या सामन्यात 3000 धावा केल्या आहेत. धोनीला एवढ्याच धावा करण्यासाठी 131 सामने खेळावे लागले होते. त्यामुळं कार्तिकच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. यापूर्वी सर्वात संथ गतीने तीन हजार धावा धोनीच्या नावावर होत्या.
ईडन गार्डन्स मैदानावर दिल्लीबरोबर रंगलेल्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 19 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार केला. कार्तिकला तीन हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 156 सामने खेळावे लागले. हीच कामगिरी धोनीनं 131 व्या सामन्यात केली होती. धोनीनंतर तिसऱ्या स्थानावर रॉबिन उथप्पा आहे. रॉबिन उथप्पाने 121 सामन्यात 3000 धावांचा टप्पा पार केला होता.
आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा दिनेश कार्तिक सातवा भारतीय आणि एकूण 13 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर, डेविड वॉर्नर, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, ख्रिस गेल, एमएस धोनी, एबी डिव्हिलियर्स, अजिंक्य रहाणे यांनी ही कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिक आतापर्यंत सहा संघाकडून खेळला आहे. 156 सामन्यातील 138 डावांत फलंदाजी करताना त्याने 25.10 च्या सरासरीने 3012 धावा केल्या आहेत. कार्तिकच्या नावावर 14 अर्धशतके आहेत.