मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये तीन जेतेपदे पटकावली आहे. पण या आयपीएलमध्ये मात्र त्यांची अवस्था दयनीय अशीच आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या खात्यात चार गुण आहेत. त्यामुळे उर्वरीत सहा सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल. जर मुंबईकडून असे घडले नाही तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते.
मंगळवारी मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मुंबईच्या बाद फेरीतील आशा धुसर दिसायला लागल्या आहेत. सध्याच्या घडीला मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे. आठ सामन्यांमध्ये त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला आहे.
मुंबईला यापुढे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत, तर दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि राजस्थान यांच्याबरोबर प्रत्येकी एक सामना आहे. मुंबईचा सध्याचा फॉर्म पाहिला तर त्यांना या सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे जवळपास कठिण दिसत आहे. त्यामुळे काही जाणकारांनी मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, असेही म्हटले आहे. मुंबईने जर आपल्या संघात काही बदल केले नाहीत तर त्यांचे आव्हान लवकरच संपुष्टात येईल, असेही म्हटले जात आहे.