नवी दिल्ली : आयपीएलला अजून सुरुवातही झाली नसली तरी त्यांच्या फ्रँचायझींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी बीसीसीआय आयपीएलच्या फ्रँचायझींना एक ठराविक रक्कम देत असते. या रक्कमेमध्ये यावर्षी चार पटींनी वाढ केली आहे.
आतापर्यंत आयपीएलचे दहा मोसम झाले. या दहा मोसमांमध्ये बीसीसीआय आपल्या फ्रँचायझींना प्रत्येकी 60 कोटी रुपये देत होती. पण यावर्षी या रकमेत बीसीसीआयने भरघोस वाढ केली आहे. या वर्षी या फ्रँचायझींना प्रत्येकी 250 कोटी रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळणार आहे.
आयपीएलच्या 11व्या मोसमाला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी पुनरागमन केले आहे. या मोसमाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई या दोन संघांमध्ये होणार आहे. आयपीएलची अंतिम फेरी 27 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्डेडियमवर होणार आहे.
बीसीसीआयची मिळकत आहे तरी केवढीजर बीसीसीआय फ्रँचायझींना एवढी मोठी रक्कम देत असेल तर त्यांची मिळकत नेमकी केवढी आहे, हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. बीसीसीआयने प्रसारण हक्कांसाठी स्टार इंडियाबरोबर 16, 347 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार बीसीसीआयला प्रत्येक मोसमासाठी 3,200 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलचे प्रायोजकत्व व्हिवो या कंपनीने आपल्याकडे ठेवले आहे. यासाठी बीसीसीआयला 2,199 कोटी रुपये मिळणार आहेत.