चेन्नई : कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगलाच भोवला. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना पुण्याला पोहोचता यावे, यासाठी चेन्नईच्या संघाने मोफत ट्रेनची व्यवस्था केली आहे.
चेन्नईच्या संघाला नेहमीच स्थानिक चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळतो. ' विसल पोडू एक्सप्रेस ' या नावाचा एक चाहत्यांचा गट संघाला नेहमीच पाठिंबा देत असतो. त्यामुळे चेन्नईचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार आहेत. पुण्याला पोहोचण्यासाठी या चाहत्यांसाठी संघ व्यवस्थापनाने एका ट्रेनची व्यवस्था केली आहे.
' विसल पोडू एक्सप्रेस ' या फॅन क्लबचे सदस्य प्रभू यांनी सांगितले की, " चेन्नईचे सामने पुण्याला स्थलांतरीत करण्यात आल्यानंतर आम्ही फार निराश झालो होतो. त्यावेळी आम्हाला पुण्याला जाण्यासाठी ट्रेन आणि विमानांच्या तिकीटांमध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्याचबरोबर एका ट्रेनमधील 2-3 डबे आमच्यासाठी आरक्षित करावेत, असेही आम्ही त्यांना सांगितले होते. पण चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने तर आमच्यासाठी पूर्ण गाडीच आरक्षित केली असून आमच्याकडून कुठलेही शूल्क आकारण्यात आलेले नाही."