नवी दिल्ली : एक कर्णधारच दुसऱ्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला चांगलं जाणू शकतो, असं काही जणं म्हणतात. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे दोन वर्षांनी पुनरागमन झाले. पुनरागमन करताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलचा चषक उंचावला. आता साऱ्यांनाच धोनीच्या नेतृत्वाचे रहस्य काय, असा प्रश्न पडला असेल. या रहस्याचा उलगडा केला आहे तो भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने.
चेन्नईच्या संघाचे मालक एन. श्रीनिवासन आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन हा सट्टेबाजीमध्ये दोषी आढळला होता. मयप्पन चेन्नईच्या संघाशी संबंधित होता. त्यामुळे चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही दोन वर्षांची बंदी संपल्यावर यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसला. पुनरागमनानंतर चेन्नईच्या संघाचे दमदार कामगिरी करत आयपीएलचे जेतेपदही पटकावले.
चेन्नईने जेव्हा आयपीएलचे जेतेपद पटकावले तेव्हा गांगुली आनंदीत झाला होता. या आनंदाच्या भरात त्याने धोनीच्या यशाचे रहस्य उलगडले. गांगुली म्हणाला की, " गेल्या दोन वर्षांमध्ये धोनी आयपीएलमध्ये पुण्याच्या संघातून खेळत होता. या दोन वर्षांत धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही, त्याच्याकडून कर्णधारपदही हिरावून घेतले. पण यंदाच्या हंगामात धोनीकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली, याचे रहस्य म्हणजे धोनी हा चेन्नईच्या संघाबरोबर भावनिकरीत्या गुंतला आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघातून खेळताना धोनीची कामगिरी नेहमीच चांगली झालेली आहे. "