नवी दिल्ली - गौतम गंभीरने दिल्ली संघाच्या कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वामध्ये दिल्ली संघाने आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये सहा सामन्यामध्ये पाच पराभव स्वीकारले. 11 व्या सत्रातील पराभवाची जबाबदारी घेत गौतमने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत गौतम गंभीरने ही माहिती दिली. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पाच पराभवासह गुणतालिकेत दिल्ली तळाला आहे. आयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरला लौकीकास साजेशी खेळ करता आला नाही. सहा सामन्यात त्याला फक्त 85 धावा करता आल्या आहे. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
आम्ही ज्या स्थानी सध्या आहोत, मी त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे कर्णधारपदावरुन मी पायउतार होत आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यर असेल. संघ म्हणून आम्ही एकत्र असून, परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे, असा माझा विश्वास असल्याचे गौतम गंभीर म्हणाला.
IPL च्या 11 व्या सत्रासाठी झालेल्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीरला 2.8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं होते. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर यावर्षी गंभीरने आपल्याला घरच्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दिल्लीने गंभीरला खरेदी केलं होतं.