नवी दिल्ली - संघाच्या खराब कामगिरीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने आणखी एक निर्णय घेतला आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत आयपीएलच्या 11 व्या सत्रात मिळणारे मानधन घेणार नसल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. आयपीएलच्या 11 व्या सत्रासाठी दिल्लीने गंभीरला दोन कोटी 80 लाख रुपयांना करारबद्ध केलं होतं. आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे की, खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मिळणारे मानधन न घेण्याचा निर्णय एखाद्या कर्णधाराने घेतला आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वामध्ये दिल्ली संघाने आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये सहा सामन्यामध्ये पाच पराभव स्वीकारले. पाच पराभवासह गुणतालिकेत सध्या दिल्ली संघ तळाला आहे. आयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरला लौकीकास साजेशी खेळ करता आला नाही. सहा सामन्यात त्याला फक्त 85 धावा करता आल्या आहे. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. यानंतर काल पत्रकारपरिषद घेत गंभीरने दिल्ली संघाचे कर्णधारपदाचा राजीनामा दिला. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पीटीआयला एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर दिल्ली संघाकडून कोणतेही मानधन घेणार नाही. गौतम गंभीरसाठी सन्मान सर्वस्व आहे. गंभीरने पैसा न घेण्याचा निर्णय स्वत: घेतला आहे. पंजाब विरोधातील सामन्यानंतर लगेच गंभीर कर्णधारपदाचा राजीनामा देणार होता. आयपीएलच्या या सत्रानंतर तो आपल्या भविष्याविषयी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आम्ही ज्या स्थानी सध्या आहोत, मी त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे कर्णधारपदावरुन मी पायउतार होत आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यर असेल. संघ म्हणून आम्ही एकत्र असून, परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे, असा माझा विश्वास असल्याचे काल झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला.
कर्णधारपद सोडण्याच्या निर्णय माझाच - गौतम गंभीर
कुणाच्या दबावामुळे किंवा सांगण्यामुळे नव्हे तर संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मी स्वत:; कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, असले म्हटले आहे. आपल्या निर्णयाबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गंभीरने सांगितले की, ''सहा सामन्यांत केवळ 85 धावांचेच योगदान देऊ शकल्याने मी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सांभाळणे योग्य आहे, असे मला वाटत नाही. कर्णधारपद सोडण्याची हीच वेळ असल्याचे मला वाटते. माझ्यावर कप्तानी सोडण्यासाठी दबाव आणण्यात आलेला नाही. मात्र तडकाफडकी निवृत्ती स्वीकारण्याची कोणतीही योजना माझ्या मनात नाही."