हैदराबाद : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या विजायात मोलाचा वाटा उचलला तो फिरकीपटू रशिद खानने. पण या पूर्वीच्या काही आयपीएलच्या सामन्यांमध्ये रशिदला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याच्या गोलंदाजीमध्ये हा बदल घडवला तो एका महान फिरकीपटूने, ही गोष्ट दस्तुरखुद्द रशिदनेच सांगितली आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात रशिद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. या सामन्यात त्याने चार षटकांमध्ये फक्त 12 धावा देत दोन विकेट्सही मिळवले होते. त्याचबरोबर हार्दिक पंड्यासारख्या धडाकेबाज खेळाडूला गोलंदाजी करताना त्याने निर्धाव षटक टाकले होते. त्यामुळे रशिद हा हैदरबादच्या विजयाचा हिरो ठरला होता.
आपल्या या नेत्रदीपक कामिगरीबद्दल रशिद म्हणाला की, " आयपीएलमध्ये माझ्याकडून चांगली सुरुवात झाली नव्हती. पंजाबविरुद्धच्या सामन्यात तर ख्रिस गेलने एका षटकात चार षटकार लगावले होते. पण त्यानंतर मला मुथय्या मुरलीधरन यांनी मार्गदर्शन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला चांगली कामगिरी करता आली, त्यामुळे या यशाचे श्रेय मी मुरलीधरन यांना देतो. "