नवी दिल्ली : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकिण प्रीती झिंटाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारण या पराभवानंतर तिने थयथयाट करत संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण केले होते. या भांडणानंतर सेहवाग चांगलाच दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. पण या वृत्तानंतर प्रीतीने मात्र 'हा ' खुलासा केला आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सेहवागने संघात काही प्रयोग केले होते. करुण नायर आणि मनोज तिवारीसारखे फलंदाज संघात असतानाही सेहवागने कर्णधार आर. अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली होती. त्याचबरोबर या सामन्यात सेहवागने काही गोष्टींमध्ये बदल केला होता. पण सेहवागचे प्रयोग या सामन्यांमध्ये फसले आणि पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर प्रीतीने मैदानात सर्वांसमोर सेहवागला खडे बोल सुनावले होते. प्रीती संघ व्यवस्थापनात ढवळाढवळ करत असल्यामुळे सेहवागही तिच्यावर चांगलाच नाराज होता. पण सर्वासमोर सेहवाग काहीच बोलला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेहवागला प्रीती डोईजोड होत असल्याचे समजते, त्यामुळे तो आता या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार असल्याचेही म्हटले जात आहे.
या साऱ्या प्रकारानंतर प्रीतीने एक ट्विट केले आहे आणि त्यामध्ये हे वृत्त खोडसाळ असल्याचे तिचे म्हणणे आहे. ट्विटमध्ये प्रीती म्हणाली की, " ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे ती खोटी आहे. माझ्या आणि सेहवागमधला संवाद तिखट-मिठ लाऊन सांगितला गेला. त्यामुळे फारच कमी वेळात मला खलनायिका ठरवण्यात आले. "