नवी दिल्ली : साल 2011... भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाला गवसणी घातली. यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरीही याच मैदानात म्हणजे वानखेडेवर रंगली. त्यामुळेच हरभजन सिंग थोडासा भावुक झाला आणि त्याने धोनीला ' हा ' संदेश पाठवला.
हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " वानखेडेच्या मैदानातच आपण विश्वचषक जिंकला होता. पण आयपीएलमध्ये तब्बल दहा वर्षे आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. त्यामुळे एका संघात आपण खेळू, असे कधीही वाटले नव्हते. पण अकराव्या वर्षी आपण एकाच संघाच खेळलो आणि जिंकलोही. वानखेडे हे आमल्यासाठी लकी मैदान आहे. "
धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने 27 मे रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादवर मात केली. धोनीच्या कप्तानीखाली चेन्नईने तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. हरभजन गेल्या दहा वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघात होता. पण यावर्षी चेन्नईने हरभजनला आपल्या संघात स्थान दिले होते.