मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे यंदाचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत शेन वॉटसनने नाबाद 117 धावांची खेळी साकारली आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आणि ते त्यांना चांगलेच भोवले आहे. कारण या ट्विटनंतर त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे.
चेन्नईचा विजय हा बॉलीवूडच्या चित्रपटाच्या पटकथेसारखा होता, असे ट्विट भोगले यांनी केले होते. या ट्विटनंतर त्यांची चांगलीच फिरकी समाजमाध्यमांवर घेतली गेली. काहींनी तर आयपीएलमधील सामने हे फिक्स असल्याचे आरोपही यावेळी केले आहेत. त्यामुळे या ट्विटची फार मोठी किंमत भोगले यांना भोगावी लागणार असे वाटत आहे.
आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर भोगले म्हणाले की, " फिल्म इंडस्ट्रीच्या मुख्यालयातून सर्वात चांगली पटकथा पाहायला मिळाली. " आपल्या ट्रोल केले जात आहे हे पाहिल्यावर भोगले यांनी आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत भोगले म्हणाले की, " चांगली पटकथा याचा अर्थ मला हे सारे फिक्स होते, असे म्हणायचे नाही, तर चेन्नईच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. "