कोलकाता : आयपीएलच्या ' क्वालिफायर-2 'मध्ये आज सनरायझर्स हैदराबादची गाठ पडणार आहे ती कोलकाता नाईट रायडर्सबरोबर. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून तयारी केली आहे. हैदराबादने तर कोलकात्याला नमवण्यासाठी खास रणनीती तयार केली आहे. हैदराबादच्या एका खेळाडूने या रणनीतीचे रहस्य उलगडले आहे.
हैदराबादने साखळी सामन्यांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे त्यांना ' क्वालिफायर-1 'मध्ये स्थान मिळाले होते. पण या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच आज त्यांना कोलकात्याचा सामना करावा लागणार आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये हैदराबादला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात ते विजय मिळवून अंतिम फेरीत जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने यावेळी ' क्वालिफायर-2 ' सामन्यासाठीची रणनीती उघड केली आहे. तो म्हणाला की, " गेल्या चार सामन्यांमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. पण ' क्वालिफायर-2 'मध्ये खेळताना आम्ही या पराभवांचा विचार करणार नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 2-3 षटकांमध्ये चांगला खेळ केला तर सामन्याचे रुप पालटू शकते. त्यामुळे आम्ही भूतकाळ विसरलो आहोत. आता परिस्थिती कशीही असली तरी ती बदलण्याची धमक आमच्या संघात आहे. त्यामुळेच हैदराबादचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल, हा विश्वास मला आहे. "