नवी दिल्ली : भारतात एक तर जास्त वेगवान गोलंदाज तयार होत नाही. तो चांगला वेगवान गोलंदाज आहे. भारताकडून त्याने प्रत्येकी 9 कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्वही केले. पण सध्याच्या घडीला त्याला आयपीएलमध्ये कुणीही वाली उरलेला नाही. एकाही संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलेले नाही.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे.
आयपीएलमध्ये आपल्याला कोणत्याही संघाने न घेतल्यामुळे हा वेगवान गोलंदाज थेट इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला गेला आहे. इंग्लंडमधून लिस्टाशायर या कौंटी संघाने भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता कौंटीमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आरोन प्रयत्नशील आहे.
आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीसह काही खेळाडू कौंटी क्रिकेट खेळणार आहेत. या दौऱ्यात तर भारतीय संघाला वेगवान गोलंदाजाची गरज भासली तर त्यांच्यापुढे वरुण आरोनचा पर्याय खुला असेल.