नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थानला 25 धावांनी पराभूत केले. या विजयासह त्यांनी ' क्वालिफायर-2 'मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता ' क्वालिफायर-2 'मध्ये त्यांना सनरायझर्सचा सामना करावा लागणार आहे. पण या ' क्वालिफायर-2 'मध्ये कोलकाता हैदराबादला पराभूत करून अंतिम फेरीत जाणार, कारण यंदाच्या आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना फिक्स आहे, असे सांगणारा एक व्हीडीओ सोशल मीडियामध्ये वायरल झाला आहे.
सोशल मीडियामध्ये वायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीचा प्रोमो दाखवला गेला आहे. या प्रोमोमध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी दोन हात करणार असल्याचं दाखवलं गेलं आहे. ' क्वालिफायर-2 'मध्ये कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील लढत अजूनही बाकी असताना हा व्हीडीओ वायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या वायरल झालेल्या व्हीडीओमध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या प्रोमोचा काही भाग दाखवला गेला आहे. हा प्रोमो स्टारच्या लाइव स्ट्रीमिंग वेबसाइट आणि हॉटस्टार यांनी केला असल्याचे म्हटले गेले जात आहे. पण या व्हीडीओची सत्यता लोकमतने पडताळून पाहिलेली नाही.