मुंबई - मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात हार्दिक पंड्याचा थ्रो थेट विकेट किपर इशान किशनला लागला. किशनच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली. काही वेळासाठी सामना थांबवावा लागला होता. ही घटना घडली त्यावेळी चेंडू ईशानच्या डोळ्यावरच आदळला असावा असा सर्वांचा समज झाला होता. त्यामुळं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला. पण काही वेळानं ईशानचा डोळा थोडक्यात वाचल्याचं लक्षात येताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
13 व्या षटकांत हार्दिक पांड्याने फेकलेला चेंडू पकडताना यष्टीरक्षक इशान किशन गंभीर जखमी झाला. हार्दिक पंड्याने टाकलेल्या चेंडूने टप्पा पडून अतिरिक्त उसळी घेत चेंडू इशानच्या डोळ्यावर आदळला. यामुळे काहीवेळ खेळ थांबविण्यात आला.
गंभीर जखमी झालेल्या इशानला मैदान सोडावे लागले आणि त्याच्या जागी आदित्य तरे याने यष्टीरक्षण केले. इशान किशन जर आयपीएलमधून बाहेर पडला तर मुंबईसाठी मोठा झटका मानला जाईल. कारण आतापर्यंत इशानची कामगिरी कौतुकास्पद आहे.
विराट खेळी व्यर्थ, मुंबईचा विजय -
सलग तीन सामने गमावून पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अखेर यंदाच्या सत्रातील आपला पहिला विजय नोंदवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 46 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद 213 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर आरसीबीला 20 षटकांत 8 बाद 167 धावा असे रोखले. एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली तटबंदीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. पण अखेर बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.