बेंगळुरूः गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा जयदेव उनाडकट हा मध्यमगती गोलंदाज यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं तब्बल ११ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलं आहे.
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी केएल राहुल आणि मनीष पांडे या भारतीय शिलेदारांवर ११ कोटींची बोली लागली होती. राहुलला किंग्ज इलेव्हन पंजाबनं, तर मनीष पांडेला सनरायजर्स हैदराबादनं खरेदी केलं होतं. परंतु, बेन स्टॉक्सनं त्यांच्याहून जास्त भाव खाल्ला होता. राजस्थान रॉयल्सनं त्याच्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपये मोजले होते. त्यानंतर, राजस्थाननंच आज जयदेव उनाडकटवर ११.५ कोटींची सर्वाधिक बोली लावली.
गेल्या वर्षी रायझिंग पुणे सुपरजायंट्सने जयदेवला ३० लाख रुपयांमध्ये - अर्थात त्याच्या बेस प्राइसला खरेदी केलं होतं. परंतु, आयपीएल १० मध्ये त्यानं आपली क्षमता सिद्ध केली. रथी-महारथी फलंदाजांना तंबूत धाडण्याची किमया त्यानं करून दाखवली होती. त्याचंच फळ त्याला यंदा मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याला तब्बल १२ कोटी २० लाख रुपये जास्त मिळालेत. सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात जयदेव उनाडकटसाठी जबरदस्त चुरस रंगली होती. पण चेन्नईच्या माघारीनंतर राजस्थान रॉयल्स मैदानात उतरलं आणि त्यांनी बाजी मारली.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स हा जयदेव उनाडकटचा आयपीएलमधील पाचवा संघ आहे. याआधी कोलकाता नाइट रायडर्स (२०१०-१२), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (२०१३), दिल्ली डेअरडेविल्स (२०१४-१५), कोलकाता नाइट रायडर्स (२०१६) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (२०१७) या संघांकडून तो खेळला आहे.