नवी दिल्ली : बुधवारी दिल्ली डेअसडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये दिल्लीला राजस्थानला पराभूत करता आलेले नाही. या लढतीपूर्वी राजस्थानचे पारडे जड दिसत असते तरी दिल्लीच्या संघात ही आकडेवारी बदलण्याची धमक नक्कीच आहे. पण या सामन्यात कोणते पाच खेळाडू लक्षवेधी ठरतील, ते आपण पाहूया.
श्रेयस अय्यर : गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यावर दिल्लीची कमान श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली. कर्णधारपद स्वीकारल्यावर अय्यरने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात नाबाद 93 धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. या मोसमात श्रेयसच्या नावावर तीन अर्धशतके आहेत.
रीषभ पंत : दिल्लीचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रीषभ पंत सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे राजस्थानच्या रडारवर सर्वप्रथम पंत हाच असेल. आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये पंतने 306 धावा केल्या आहेत. आठ सामन्यांमध्ये 85 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून त्याच्या खात्यात दोन अर्धशतके आहेत.
संजू सॅमसम : राजस्थानचा सर्वात फॉर्मात असलेला फलंदाज म्हणजे संजू सॅमसन. आतापर्यंत आपल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर संजूने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे. संजूने राजस्थानच्या विजयातही बऱ्याचदा मोलाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये त्याने 279 धावा केल्या असून यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. आतापर्यंत त्याची नाबाद 92 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आतापर्यंत भेदक मारा केला आहे. दिल्लीच्या गोलंदाजीचे यशस्वीपणे सारथ्य बोल्टने केलेले आहेत. आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये बोल्टने 11 फलंदाजांना बाद केले आहे. त्याचबरोबर 2 बाद 21 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जोफ्रा आर्चर : जोफ्रा आतापर्यंत राजस्थानकडून फक्त दोनच सामने खेळला आहे. पण या दोन सामन्यांमध्ये त्याने सहा बळी मिळवत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पण आजच्या सामन्यात जोफ्राला संधी मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.