मुंबई - यंदाच्या आयपीएल सत्रामध्ये पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यारी प्रणाली (डीआरएस) सुरु करण्यात येणार असून या निर्णयावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे यंदा पहिल्यांदाच फुटबॉल लीगच्या धर्तीवर स्पर्धा सुरु असतानाच खेळाडूंची बदलही करता येणार असून या निर्णयाचेही दोघांनी स्वागत केले.
यंदा पहिल्यांदाच लीग सुरु असताना राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले खेळाडू आणि लीगच्या अर्ध्या सत्रापर्यंत दोनहून अधिक सामने न खेळलेल्या खेळाडूंची बदल करण्याची मुभा फ्रेंचाइजींना मिळाली आहे. या निर्णयावर जयवर्धनेने सांगितले की, ‘फ्रेंचाइजी मॉडलसाठी हे प्रगतीचे पाऊल आहे. यामुळे अनेक संधी निर्माण होतील आणि सत्र सुरु असतानाच अशी अदलाबदल करणे सर्वच संघासाठी नवीन असेल. यामुळे कोणत्या वेळेला आपल्या संघात कोणाची आवश्यकता आहे, हे प्रत्येक फ्रेंचाइजीला जाणून घेता येईल. हे सर्वकाही परिस्थितींवर अवलंबून असेल.’ त्याचवेळी डीआरएसविषयी जयवर्धने म्हणाला की, ‘आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डीआरएसचा समावेश आहे आणि आता आयपीएलमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. सामन्यांमध्ये अनेक चुका होतात आणि डीआरएसची खूप मदत होते. या निर्णयानंतर मी आनंदी आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या निर्णयाची सवय असून युवांना यातून खूप शिकण्यास मिळेल.’ यावेळी रोहितनेही आपल्या प्रशिक्षकांच्या मताचे समर्थन करताना, ‘हे दोन्ही निर्णय खेळ आणि स्पर्धेसाठी खूप चांगले आहेत.
शेवटी प्रत्येकाला चांगल्या
निकालाची अपेक्षा असते आणि डीआरएसमुळे आम्हाला मदत होईल.’ असे म्हटले.
चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करणार की मधल्या फळीत खेळणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे खुद्द रोहितने याविषयी गुप्तता पाळताना सांगितले की, ‘याविषयी मला कोणताही खुलासा करायचा नाही.’ याविषयी रोहितने म्हटले की, ‘माझ्या क्रमवारीविषयी मी आत्ता काही बोलणार नाही. आमची मध्यफळी चांगली असून आमच्याकडे एल्विन लुइस (वेस्ट इंडिज) आणि इशान किशन यांच्यारुपाने चांगले सलामीवीर आहेत. मी कोणत्या क्रमांकावर खेळेल हे सात तारखेलाच कळेल.’
Web Title: IPL 2018 : Mahela Jayawardene is happy with the inclusion of DRS rules
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.