मुंबई : आयपीएलच्या 11व्या पर्वातील दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावल्यानं चाहते नाराज असले, तरी या दोन सामन्यांमधून भारतीय क्रिकेटला एका हिऱ्याचा शोध लागलाय. तो म्हणजे, फिरकीपटू मयांक मार्कंडे. पहिल्या - चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तीन आणि गुरुवारी हैदराबादच्या चार विकेट्स घेऊन त्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. सळसळता उत्साह, चेहऱ्यावर तेज, आत्मविश्वास आणि भल्या-भल्या फलंदाजांची गिरकी घेणारी फिरकी हे त्याचे गुण प्रभावित करणारे आहेत. मयांक मार्कंडे हा सुरुवातीला जलदगती गोलंदाजी करायचा. पण, त्याची 'स्लोअर-बॉल'ची शैली पाहून प्रशिक्षकांनी त्याला फिरकीचा सराव करण्याचा सल्ला दिला. तो गांभीर्यानं घेत मयांकनं खूप मेहनत घेतली आणि आज तो आपल्या लेग स्पिन आणि गुगलीनं दिग्गजांना चकवतोय.
या पठ्ठ्याची आणखी एक गंमत म्हणजे, मुंबई इंडियन्सनं आपल्याला संघात घेतलंय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. वेगवेगळ्या जणांचे ३०० एसएमएस आणि ३७ मिस्ड कॉलनंतरही त्याला हे खरं वाटत नव्हतं. अखेर, मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापक राहुल संघवी यांच्या फोननंतर त्याची खात्री पटली होती.
मयांक मार्कडेबद्दल महत्त्वाचं...
>> मयांक मार्कंडे हा मूळ भटिंडाचा 'पुत्तर'.
>> पंजाबच्या अंडर-१९ संघात त्यानं वयाच्या १६व्या वर्षी पदार्पण केलं होतं आणि २०१६ मध्ये तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचा शिलेदार होता.
>> पदार्पणाच्या सामन्यात मयांकने सात विकेट्स घेतल्या होत्या आणि पुढच्या दोन सामन्यांनंतर आणखी ११ विकेट्स त्याच्या खात्यात जमा झाल्या होत्या.
>> ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर गोलंदाज शेन वॉर्न हा मयांकचा आदर्श आहे.
>> सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मयांकनं पाच विकेट्स मिळवल्या होत्या आणि विजय हजारे ट्रॉफीत बळींचं दशक पूर्ण केलं होतं.
>> या कामगिरीची दखल घेऊन, मुंबई इंडियन्सनं त्याला २० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं.
>> आयपीएल पदार्पणाआधी मार्कंडे लिस्ट ए मधील सहा आणि चार स्थानिक टी-२० सामने खेळला होता.
>> पहिल्या आयपीएल सामन्यात २३ धावांच्या बदल्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या कुठल्याही फिरकीपटूला पदार्पणतच अशी कामगिरी करता आली नव्हती. जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगानं मुंबईसाठी पहिल्या सामन्यात १५ धावांच्या बदल्यात तीन विकेट्स मिळवल्या होत्या.