पुणेः गेल्या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं सोमवारी दिल्लीलाही धू-धू धुतलं. २२ चेंडूत नाबाद ५१ धावांची तडाखेबंद खेळी त्यानं केली. त्याचं हे धुमशान पाहून चाहते खूश झालेत. 'जुना धोनी' परतल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे. 'कॅप्टन कूल'च्या या खणखणीत 'कमबॅक'मागचं कारण आता समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंह धोनी रोज तीन तास जिममध्ये असतो. ताकद आणि फिटनेस वाढवण्यासाठी तो व्यायाम करतोय, घाम गाळतोय. त्यामुळेच त्याच्या बॅटमधून पुन्हा लांबच-लांब षटकार निघू लागलेत, धावांचा पाऊस पडू लागलाय.
महेंद्रसिंह धोनीच्या खेळावर वयाचा परिणाम दिसू लागलाय, धोनी थकल्यासारखा वाटतोय, त्याच्या निवृत्तीची वेळ जवळ आलीय, अशी टीका-टिप्पणी काही काळापासून सुरू होती. पण, रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध ७० धावांची वादळी खेळी करून धोनीनं सगळ्यांची तोंडं बंद करून टाकली होती. त्यानंतर, सोमवारी त्यानं आयपीएल-११ मधील तिसरं अर्धशतक झळकावलं. दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडत, त्यानं २००च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. या ५१ धावांनंतर, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. ८ सामन्यांत त्यानं २८६ धावा केल्यात. त्यात २० षटकारांचा समावेश आहे. धोनीच्या या पुनरागमनामागचं रहस्य काल समालोचकांनी सांगितलं. वयाचा खेळावर परिणाम होतोय, ही बाब लक्षात आल्यानंतर धोनीनं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलंय आणि तो जिममध्ये झपाटून व्यायाम करू लागलाय. ती 'पॉवर' त्याच्या फटक्यांमधून दिसतेय, असं त्यांनी सांगितलं.
चेन्नई सुपरकिंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. दिल्लीचा १३ धावांनी पराभव करून धोनीसेनेनं अव्वल स्थानी झेप घेतली. शेन वॉटसन आणि धोनीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चेन्नईनं २११ धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला १९८ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि चेन्नईनं विजयाचा षटकार ठोकला.