पुणेः 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी मैदानावरील कामगिरीनं चाहत्यांची मनं जिंकतोच, पण मैदानाबाहेरही आपल्या वागण्या-बोलण्यातून नवे आदर्श घालून देतो. कालचा, जागतिक कामगार दिवससुद्धा त्यानं 'हटके' साजरा केला आणि सगळ्यांची वाहवा मिळवली.
धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार आहे. यंदा पुण्याचं गहुंजे स्टेडियम हे चेन्नईचं 'होम ग्राउंड' आहे. गेल्या दोन पर्वात धोनी पुण्याकडून खेळलाय. २०१६ मध्ये तो पुणे संघाचा कर्णधारही होता. म्हणजेच, चेन्नईचं चिदंबरम स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमशी त्याचं वेगळं नातं आहे. ते ओळखूनच, कामगार दिनाच्या निमित्ताने, या दोन्ही स्टेडियमची देखभाल करणाऱ्या कामगारांना धोनी भेटला, त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांना धन्यवादही दिले.
चेन्नई सुपरकिंग्जने इन्स्टाग्रामवर 'ग्राउंड स्टाफ'सोबतचा धोनीचा फोटो शेअर केला आहे. त्याला लाखाच्या वर लाइक्स मिळालेत. कोणताही क्रिकेट सामना ज्यांच्यामुळे रंगतो, जे पडद्यामागे राहून सगळी सूत्रं सांभाळतात त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. पण, धोनीनं कामगार दिनाच्या दिवशी आवर्जून त्यांच्याशी संवाद साधला. कॅप्टन कूलसोबत काही वेळ निवांत बोलता आल्यानं 'ग्राउंड स्टाफ'चा दिवसही गोड झाला.