ठळक मुद्देपराभवाच्या मालिकेनंतरही संघात बदल होत नसेल तर तो कर्णधार नेमका करतो तरी काय, हा प्रश्न मुंबईच्या मार्गदर्शकांना तरी पडायला हवा होता.
प्रसाद लाड
भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पानं का सडली, न फिरवल्यामुळे... हे बऱ्याच वर्षांपासूनचे बोल आजही खरे ठरतात. अगदी क्रिकेटच्या बाबतीतही. आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सच्या संघाचे उदाहरण घ्या ना. मुंबई का हरली, तर काही ठराविक खेळाडूंनाच त्यांनी खेळण्याची संधी दिली. त्यांनी जर संघात खेळाडू चांगल्यापद्धतीने फिरवले असते तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडायची वेळंच आली नसती.
मुंबईच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंचा ताफा ठरवलेला होता. त्यांच्याकडून कामगिरी कशीही झाली तरी त्यांचे संघातील स्थान कायम राहत होते. त्यामुळे खेळाडू सुस्तावले होते. आपल्याला संघातून बाहेर काढणार नाही, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे चांगली कामगिरी करण्याची किंवा विजयाची इर्षा त्यांच्यामध्ये जास्त दिसली नाही.
या मोसमात इशान किशन सातत्याने अपयशी ठरत होता. 14 पैकी फक्त एकाच सामन्यात काय ती त्याने चांगली फलंदाजी केली. मुंबईकडे आदित्य तरेच्य रुपात चांगला पर्याय उपलब्ध होता. पण रोहित शर्माने किशनऐवजी तरेला काही केल्या संधी दिली नाही. मुंबईच्या संघात अकिला धनंजयासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फिरकीपटू संघात होता. पण त्याला जास्त संधीच दिली नाही. रोहितने किशनबरोबर कायरन पोलार्ड, जेपी ड्युमिनासारख्या खेळाडूंवर अतिआत्मविश्वास ठेवला. पण या दोघांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण तरीही त्यांना रोहितने संधी दिली. संघात सिद्धेश लाडसारखा धडाकेबाज फलंदाज होता. अनुकूल रॉयसारखा युवा अष्टपैलू खेळाडू संघात होता. सौरभ तिवारीसारखा डावखुरा फलंदाज मुंबईकडे होता, पण त्यांनाही रोहितने संधी दिली नाही.
आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये प्रदीप सांगवानसारखा अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करत होता. मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले खरे, पण त्याला फक्त एकाच सामन्यात संधी दिली. तजिंदर सिंग, मोहसिन खान, एमडी निधीश यांना तर एका सामन्याचा टिळाही लावला नाही. बाद फेरीत जे चार संघ पोहोचले आहेत, त्यांच्या कामगिरीवर नजर फिरवली तरी त्यांनी संघात प्रत्येक सामन्यागणिक बदल केले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तर एका सामन्यात चक्क तीन फिरकीपटूंना खेळवण्याचा प्रयोगही करून पाहिला. सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमार, युसूफ पठाण यांनाही विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी दिली. राजस्थान रॉयल्सने फलंदाजीमध्ये बरेच बदल केले. कर्णधार अजिंक्य रहाणेने तर स्वत: हून फलंदाजीला येणे टाळले होते.
तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर संघात बदल करणे क्रमप्राप्त असते. पराभवाच्या मालिकेनंतरही संघात बदल होत नसेल तर तो कर्णधार नेमका करतो तरी काय, हा प्रश्न मुंबईच्या मार्गदर्शकांना तरी पडायला हवा होता. मुंबईच्या मार्गदर्शकांची टीम एवढी मोठी आहे की, त्यांचाच एक संघ तयार होऊ शकतो. पण एवढी मातब्बर मंडळी असतानादेखील त्यांना संघात बदल करावासा वाटू नये, हे आश्चर्यकारकच.
Web Title: IPL 2018: Mumbai Indians lose their ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.