ठळक मुद्देआपल्या शंभराव्या सामन्यात सूर्यकुमार यादवला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
हैदराबाद : आयपीएलच्या सलग दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची सुमार कामिगरी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामिगरी करता आली नाही. त्यांची पुरती नाचक्की झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 147 धावांवरच समाधान मानावे लागले.
हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच षटकात दीपक हुडाने झेल सोडत जीवदान दिले. त्यानंतर रोहितने दोन चौकारही लगावले. पण या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित 11 धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या इशान किशनने (9)पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली. त्यानंतर आठ धावांवर असतानाहा त्यालाही जीवदान मिळाले, पण या जीवदानाचा फायदा त्यालाही उचलता आला नाही. किशन बाद झाला तेव्हा मुंबईचे सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या (15) या दोघांनी आपले खातेही उघडले नव्हते. शकिब अल हसनच्या नवव्या षटकात पंड्याने सलग दोन चौकार लगावले. पण या षटकाच्याच पाचव्या चेंडूवर शकिबने कर्णधार केन विल्यम्सनकरवी पंड्याला तंबूचा रस्ता दाखवला.
सूर्यकुमार आणि कायरन पोलार्ड हे दोघेही धडाकेबाज फलंदाज असले, तरी त्यांनी काही काळ आपल्या फटक्यांना मुरड घातली. त्यामुळे 13व्या षटकापर्यंत मुंबईची 4 बाद 90 अशी स्थिती होती. पण त्यानंतर मात्र पोलार्डने आपल्या पोतडीतील फटके बाहेर काढले. शकिबच्या 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. त्यानंतर पंधराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने जो सरळ रेषेत षटकार लगावला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. पण त्याची ही खेळी जास्त रंगली नाही. पंधराच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने चुकीचा फटका खेळला आणि त्याला तंबूची वाट धरावी लागली. पोलार्डने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 28 धावा केल्या.
आपल्या शंभराव्या सामन्यात सूर्यकुमार यादवला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईच्या 16 षटकांनंतर सूर्यकुमारने 25 चेंडूंत 21 धावाच केल्या होत्या. त्यानंतरही सूर्यकुमारही तळपला नाही. आपल्या या महत्वाच्या सामन्यात सूर्यकुमारला 31 चेंडूंत 28 धावाच करता आल्या.
Web Title: IPL 2018: Mumbai's batsman's poor show; scored 147 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.