मुंबई : कृणाल पंड्याने केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 165 धावा केल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (43) आणि इशान किशन (40) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. पण ठराविक फरकाने हे दोघेही बाद झाल्यावर हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी जोरदार फटकेबाजी केली. हार्दिकपेक्षा कृणाल अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. कृणालने चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि 22 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 41 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकने 20 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या.