मोहाली : रविवारी आयपीएलमधील किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयासाठी सर्वस्व पणाल लावले होते. या खेळीदरम्यान धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. पण तरीही त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि कुठलीही दुखापत झाली तरी आपले हात धावा करण्यासाठी सक्षम आहेत, हे त्याने दाखवून दिले आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीची पाठिची दुखापत बळावली होती. त्यामुळे मैदानात त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर धोनीने तुफानी फलंदाजी करत 44 चेंडूंत नाबाद 79 धावांची खेळी साकारली, आयपीएलमधली त्याची ही सर्वोत्तम खेळी ठरली.
पाठिच्या दुखण्यानंतरही तू चांगली फटकेबाजी कशी केली, असा प्रश्न विचारल्यावर धोनी म्हणाला की, " रविवारी फलंदाजी करत असताना माझ्या पाठित उसण भरली होती. पण त्यानंतर मी फलंदाजी करताना पाठिचा वापर कमी केला, कारण माझे हातच फटकेबाजी करण्साठी पुरेसे आहेत. "