Join us  

IPL 2018: मुंबई इंडियन्सला आता 'ही' व्यक्तीच दाखवू शकते 'अच्छे दिन'!

मुंबईला सहापैकी फक्त एक सामना जिंकता आलाय. दोन सामन्यांत तर त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 11:44 AM

Open in App

मुंबईः आयपीएलची तीन जेतेपदं पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वात पार बोऱ्या वाजला आहे. 'हिटमॅन' रोहित शर्माच्या शिलेदारांना सहापैकी पाच सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. कधी गोलंदाज फ्लॉप, तर कधी फलंदाजांची हाराकिरी अशा दुष्टचक्रात मुंबईची नैय्या काही पार होत नाहीए. उद्योगपती अंबानींच्या या संघाला 'अच्छे दिन' दाखवण्याची किमया एकच व्यक्ती करू शकते आणि ती म्हणजे जगप्रसिद्ध 'प्रेयर आंटी' - अर्थात मुकेश अंबानी यांच्या सासूबाई. मुंबईचे चाहते सोशल मीडियावरून या आजींना 'परत या, परत या' अशी साद घालताहेत.  

गेल्या वर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात 'प्रेयर आंटी' मुंबईच्या 'विजयाच्या शिल्पकार' ठरल्या होत्या. पुण्याला जिंकण्यासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज असल्यानं त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. इतक्यात, एका आजीबाईंकडे कॅमेरा वळला. त्या हात जोडून, डोळे मिटून मुंबईच्या विजयासाठी मनोभावे प्रार्थना करत होत्या. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'प्रेयर आंटी' असं त्यांचं नामकरणही करण्यात आलं. या आजींची प्रार्थना फळाला आली होती आणि मुंबईनं विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे शेवटची ओव्हर टाकणाऱ्या मिचेल जॉन्सनपेक्षा त्यांचीच चर्चा जास्त झाली होती. या आजी म्हणजे नीता अंबानी यांच्या मातोश्री - पूर्णिमा दलाल असल्याचं ट्विट अभिषेक बच्चननं दुसऱ्या दिवशी केलं होतं.  

यंदाच्या पर्वात आजीबाईंचं दर्शन फारसं घडलेलं नाही. त्याचवेळी, मुंबईला सहापैकी फक्त एक सामना जिंकता आलाय. दोन सामन्यांत तर त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता. तसंच, मंगळवारी हैदराबादचं ११९ धावांचं आव्हानही मुंबईला झेपलं नव्हतं. त्यांची ही दारूण अवस्था पाहून नेटिझन्स पुन्हा आजींचा धावा करू लागले आहेत.  

 

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरोहित शर्मा