- ए. बी. डिव्हीलियर्स लिहितात...
रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आरसीबीचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी मला एका बाजूला घेऊन गेले. निकालामुळे ते निराश होते, पण पराभवानंतरही संघासाठी काही सकारात्मक बाबी घडल्याचे ते मला सांगत होते. व्हिटोरी असे प्रशिक्षक आहेत की, ते जे काही सांगतात त्याला काही अर्थ असतो. मी पूर्णपणे त्यांच्या मताशी सहमत आहे.
विराट व मी सलग चेंडूवर बाद व्हायला नको होते, हे आम्हाला कळते. त्यावेळी आक्रमक पवित्रा स्वीकारीत आमच्यापैकी एकाने ७०-८० धावा कुटायला हव्या होत्या. त्याचप्रमाणे सुनील नरेनला केकेआर संघाला शानदार सुरुवात करून देण्यापासून रोखणे आवश्यक होते, पण आता जे घडायचे ते घडून गेले. व्हिटोरीने म्हटल्याप्रमाणे काही बाबी पराभवामध्येही चांगल्या घडल्या आहेत. पहिली बाब म्हणजे, या मोसमात आरसीबी संघाबाबत बरीच चर्चा आहे. ही बाब मला गेल्या वर्षी ऐकायला मिळाली नाही. सामन्यानंतर हॉटेलमध्ये परतत असताना संघातील खेळाडू शांत होते. कोलकातामध्ये आम्हाला आमच्या चुकांचे मोल द्यावे लागले, याची आम्हाला कल्पना आहे. पण, आम्ही समतोल असलेल्या संघाविरुद्ध आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळत होतो. तरी आम्ही येथे चांगली लढत दिली.
दुसरी बाब म्हणजे आमचे संघ व्यवस्थापन चांगले आहे. आम्हाला चांगले प्रशिक्षक दिल्या जात आहे. सर्वसाधारणपणे क्रिकेटमध्ये वॉर्मअप फिटनेस इंस्ट्रक्टर देतो, पण आरसीबीमध्ये यंदा प्रत्येक खेळाडूला आपला वॉर्मअप स्वत: करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तो नेट््समध्ये खेळू शकतो. फिटनेस एक्सरसाईज करू शकतो, क्षेत्ररक्षणाचा सराव करू शकतो. एकूण विचार करता खेळाडूला ज्याची आवड आहे ती बाब तो करू शकतो. खेळाडूला जे काही करायचे आहे त्याची मदत करण्यासाठी प्रशिक्षक आमच्या जवळपास असतात. हा वेगळा प्रयोग असून मला तो आवडला आहे.
तिसरी बाब म्हणजे संघाचे आघाडीचे चार फलंदाज चांगले खेळले तर आरसीबीची कामगिरी चांगली होते. कारण संघाच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये कामगिरीत सातत्य नसते, अशी धारणा आहे. संघाबाबत यंदा मात्र मत बदलले आहे. कोलकाताविरुद्धच्या लढतीत मला याची प्रचिती आली. आमच्या गोलंदाजांनी जीव तोडून गोलंदाजी केली. त्यामुळे मी प्रभावित झालो. आमच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये विविधता व भेदकता आहे. त्याचप्रमाणे राखीव खेळाडूंमध्येही बरेच पर्याय आहेत. त्यामुळे संघाला लवकरच सूर गवसेल व सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्ही छाप सोडण्यात यशस्वी ठरू, असे मला वाटते. त्यासाठी यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतीपेक्षा दुसरी कुठली चांगली संधी नाही. आम्हाला यानंतर गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळायचे आहे. (टीसीएम)
Web Title: IPL 2018: Now the time to leave the impression
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.