नवी दिल्ली : महिलांचे आयपीएल सामने सुरु करण्याच्या दृष्टीने बीसीसीआयने एक ठोस पाऊल टाकले आहे. सध्या सुरु असलेल्या पुरुषांच्या आयपीएलच्या ' क्वालिफार-1' या सामन्यापूर्वी महिलांचा एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये महिलांच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलमध्येही महिलांचे सामने व्हावेत, असे वाटत आहे.
आयपीएलचा ' क्वालिफार-1' हा सामना 22 मे रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दुपारी 2.30 मिनिटांनी महिलांचा एक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांत प्रत्येकी 15 खेळाडू असतील, यामध्ये 10 भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंची समावेश असेल. या सामन्याला आयपीएलच्या प्रशासकिय समितीनेही मान्यता दिली आहे. बीसीसीआयने आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळांशी खेळाडूंना परवानगी देण्यासाठी चर्चा सुरु केली आहे.
भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या सीओएच्या सदस्या डायना एल्डुजी यांनी या बाबतीत सांगितले की, " प्रायोगिक तत्वावर आम्ही महिलांचा सामना खेळवण्याचे ठरवले आहे. दोन्ही संघांत मिळून 30 खेळाडू असतील, यापैकी 10 परदेशी खेळाडू असतील. भारतीय खेळाडूंची निवड राष्ट्रीय समिती करणार आहे. महिलांच्या आयपीएलच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल असेल. "