मुंबई: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर 10 गडी आणि 71 चेंडू राखून विजय मिळवला. बँगलोरच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सला दिलासा मिळाला आहे. पंजाबच्या पराभवामुळे प्ले ऑफची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. पंजाब अगदी आरामात प्ले ऑफमध्ये पोहोचेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र आता पंजाबची प्ले ऑफची वाट बिकट झाली आहे. तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेला बँगलोरचा संघ पुन्हा प्ले ऑफच्या शर्यतीत दाखल झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर इतर दोन स्थानांसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफची समीकरणं पुढीलप्रमाणे असतील.कोलकाता नाईट रायडर्स: 12 सामने, 6 विजय, 6 पराभव, नेट रन रेट -0.189कोलकात्याचा संघ 12 सामन्यांमध्ये 12 गुण मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्ध 102 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकात्यानं जोरदार पुनरागमन करत पंजाबचा पराभव केला. आज (15 मे) कोलकात्याचा सामना राजस्थानविरुद्ध होईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाचे 14 गुण होतील. कारण राजस्थानचेही 12 गुण आहेत. त्यामुळे आज कोलकात्याचा संघ जिंकल्यास त्यांना प्ले ऑफ खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढेल. आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यास कोलकात्याला अखेरच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. यासोबतच कोलकात्याचा प्ले ऑफमधील प्रवेश राजस्थान आणि पंजाबच्या पराभवावरदेखील अवलंबून असेल. रन रेटच्या बाबतीत कोलकात्याचा संघ (-0.189), मुंबई (+0.405) आणि बंगळुरुपेक्षा (+0.218) मागे आहे. राजस्थान रॉयल्स: 12 सामने, 6 विजय, 6 पराभव, 12 गुण, नेट रन रेट -0.347स्पर्धेत खराब सुरुवात झाल्यानंतर राजस्थाननं जोरदार पुनरागमन केलं आहे. सध्या राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. शानदार फॉर्मात असलेला जोस बटलर आणि अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर यांची कामगिरी चांगली होते आहे. राजस्थाननं आज कोलकात्याचा पराभव केल्यास, त्यांचे 14 गुण होतील. राजस्थानचा नेट रन रेट अतिशय खराब असल्यानं त्यांना शेवटच्या सामन्यातही विजय मिळवावा लागेल. फक्त एक सामना जिंकल्यास त्यांची प्ले ऑफची वाट खडतर होईल. किंग्स इलेव्हन पंजाब: 12 सामने, 6 विजय, 6 पराभव, 12 गुण, नेट रन रेट -0.518ख्रिस गेल, लोकेश राहुल, अँड्रू टाय यांच्या कामगिरीमुळे पंजाबनं झोकात स्पर्धेची सुरुवात केली होती. त्यामुळे पंजाब अगदी आरामात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवेल, असं वाटत होतं. मात्र गेल्या तीन सामन्यांमधील पराभवांमुळे त्यांची घसरण झाली आहे. बँगलोरविरोधात पंजाबला दारुण पराभव पत्करावा लागल्यानं त्यांचा नेट रन रेट घसरला आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या विरुद्धचे सामने जिंकावेच लागतील. फक्त एक विजय मिळवून पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळणार नाही. त्यांना दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्स : 12 सामने, 5 विजय, 7 पराभव, 10 गुण, नेट रन रेट +0.405 मुंबईचे 12 सामन्यांमध्ये 10 गुण असले तरी चांगला नेट रन रेट त्यांच्यासाठी दिलासादायक ठरु शकतो. पंजाबला बंगळुरुविरोधात मोठा पराभव पत्करावा लागल्यानं मुंबईला लाईफ लाईन मिळाली आहे. मुंबईनं पंजाब आणि दिल्लीविरुद्धचे सामने जिंकल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येईल. मात्र एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्यास नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. मात्र हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा अन्य संघांचेही 14 ऐवजी 12 गुण असतील आणि त्यावेळी मुंबईचा नेट रन रेट सर्वाधिक असेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर: 12 सामने, 5 विजय, 7 पराभव, 10 गुण, नेट रन रेट +0.218 मुंबईसारखाच बँगलोरचा नेट रन रेटदेखील चांगला आहे. मात्र तरीही त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. इतकंच नव्हे, तर त्यांना नशिबाचीही साथ लागेल. पंजाब आणि कोलकात्याचा संघ कमीत कमी एका सामन्यात पराभूत झाल्यास बँगलोरला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळेल. दोन सामने जिंकल्यावर बँगलोरचे 14 गुण होतील. त्यांचा नेट रन रेटदेखील चांगला आहे. त्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळू शकेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2018: एका सामन्यानं बदलली समीकरणं; दोन जागांसाठी लढणार पाच संघ
IPL 2018: एका सामन्यानं बदलली समीकरणं; दोन जागांसाठी लढणार पाच संघ
आयपीएल स्पर्धेतील चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 3:16 PM