नवी दिल्ली : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने स्टीव्हन स्मिथची उचलबांगडी केली, पण त्याच्याजागी कोणत्या खेळाडूला ते संघात स्थान देणार आहेत ही चर्चा चांगलीच रंगत होती. पण राजस्थानच्या संघाने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. हशिम अमला आणि जो रूट या अनुभवी खेळाडूंना वगळून राजस्थानच्या संघाने ' या ' खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्याचे ठरवले आहे.
दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या मंडळाने स्मिथवर एका वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर राजस्थानचा संघ त्याच्या जागी नवीन खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करायच्या प्रयत्नात होता.
राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने यावेळी अमला आणि रूट यांच्या नावावर जोरदार चर्चा केली. पण ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या दोघांपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिच क्लासीन हा चांगली कामगिरी करू शकतो, असे राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाला वाटले. त्यामुळे त्यांनी क्लासीनची निवड केली आहे. राजस्थानच्या संघाने क्लासीनचे नाव बीसीसीआयला कळवले आहे. बीसीसीआयकडून होकार आल्यावर त्याबाबतची प्रक्रीया पूर्ण केली जाईल. भारताविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांत क्लासीनने धडाकेबाज फलंदाजी केली होती.