नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात जर कोणता संघ मालक किंवा मालकीण चर्चेत आली असेल तर ती म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाची मालकिण प्रीती झिंटा. पंजाबचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागबरोबर झालेले तिचे भांडण असो किंवा मुंबई पराभूत झाल्यानंतर केलेले वक्तव्य, या गोष्टींमुळे प्रीती चांगलीच प्रकाशझोतात आली. आता पंजाबचे आव्हान संपुष्टात आले, पण तरीही तिने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली एक वक्तव्य केले आहे.
पंजाबची आयपीएलच्या पहिल्या सत्रातील कामगिरी नेत्रदीपक अशीच होती. कारण पहिल्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी पाच सामने जिंकले होते. त्यानंतर प्रीती आणि सेहवाग यांच्यामध्ये खटके उडाले आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही पाहायला मिळाला. कारण त्यानंतर झालेल्या आठ सामन्यांमध्ये पंजाबला फक्त एकच सामना जिंकता आला होता.
रविवारी जेव्हा मुंबईचा संघ पराभूत झाला आणि त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तेव्हादेखील आपल्या वक्तव्यामुळे प्रीती चांगलीच ट्रोल झाली होती. ट्विटरवर एका कार्यक्रमासाठी प्रीतीला बोलावण्यात आले होते. यावेळी तिला एका चाहत्याने कोहलीबाबत प्रश्न विचारला होता. कोहलीबद्दल तुला काय वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर प्रीतीने फक्त एका शब्दात उत्तर दिले आणि ते होते ' शानदार '.