पुणेः दिल्ली डेअरडेविल्सकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला काल आयपीएल-११ मधून गाशा गुंडाळावा लागला. मुंबई 'आउट' झाल्यानं मुंबईकर नाराज झाले असताना, किंग्स इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीती झिंटाला जणू आनंदाचं भरतं आल्याचं पाहायला मिळालं. प्रीतीची खळी खुलल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
'मुंबई प्ले-ऑफमध्ये जाणार नसल्यानं मी खूप खूश आहे. मला खूपच आनंद झालाय', असं आपल्या सहकाऱ्याला सांगत प्रीती स्टेडियम स्टँडमध्ये खिदळत होती. हे कॅमेऱ्याने नेमकं टिपलं. हा व्हिडीओ ट्विटरवर पडला आणि मुंबईच्या चाहत्यांनी प्रीतीची शाळा घेतली, तिची खिल्लीही उडवली. प्रीतीच्या या आनंदामागचं कारण काय असेल, यावरूनही धम्माल चर्चा सुरू झाली.
प्रीतीचा आनंद गगनात मावेना....
काल आयपीएलचे दोन सामने झाले. त्यातील पहिल्या सामन्यात मुंबईचं काय होतं, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. मुंबईनं दिल्लीला हरवलं असतं, तर त्यांनी प्ले-ऑफमध्ये धडक मारली असती. पण, गुणतालिकेत शेवटच्या स्थानी असलेल्या दिल्लीनं रोहित शर्माच्या शिलेदारांचं स्वप्नं धुळीस मिळवलं. ही बातमी पुण्याला प्रीतीपर्यंत पोहोचली, तेव्हा तिची खळी खुलली. वास्तविक, मुंबईच्या पराभवामुळे पंजाबला तसा काहीच फायदा नव्हता. कारण पंजाबच्या 'किंग्स'ना धोनीसेनेला फक्त हरवायचंच नव्हतं, तर मोठ्या फरकाने हरवायचं होतं. ते थोडं कठीणच असल्यानं पंजाबचं बाहेर पडणं जवळपास नक्की होतं आणि झालंही तेच. त्यामुळेच, मुंबईच्या पराभवानं प्रीतीला एवढा आनंद का झाला, हे समजू शकलेलं नाही.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या चार संघांमध्ये आता जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे.