इंदूरः आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबची गाडी पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झोकात विजय मिळवून त्यांनी प्ले-ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. स्वाभाविकच, या सामन्यानंतर त्यांनी दणक्यात सेलिब्रेशन केलं. त्यावेळी केक कापण्याच्या जंगी कार्यक्रमात संघाची मालकीण प्रीती झिंटानं आपल्या शिलेदारांना 'मोठ्या आवाजात' समज दिली. त्याचं झालं असं की, राजस्थानला मात देऊन आलेल्या 'किंग्स'च्या स्वागतासाठी शॅम्पेन आणि केक सज्ज होता. पंजाबच्या विजयाचा शिलेदार के एल राहुलनं शॅम्पेनची बाटली फोडायला घेताच, ख्रिस गेल पुढे आला आणि त्यानं ही जबाबदारी हसत-हसत स्वीकारली. त्यामुळे मग राहुल आणि इतर सहकाऱ्यांनी आपला मोर्चा केककडे वळवला. राहुल केक कापणार इतक्यात प्रीती झिंटा धावत पुढे आली. 'अर्धा केक खायला ठेवा', असं फर्मानच तिनं सोडलं. तसं झालं नसतं तर, अख्खा केक राहुलच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या चेहऱ्याला फासला गेला असता, याची तिला खात्रीच होती. शेवटी, अर्धा केक एकमेकांच्या चेहऱ्याला लावण्यातच संपला. के एल राहुलचा चेहरा तर पार 'चॉकलेटी' होऊन गेला होता. बघा, कसं झालं हे सेलिब्रेशन...
आयपीएल ११ मधील ३८व्या सामन्यात पंजाबनं राजस्थानचा सहा विकेट्सनी पराभव केला. राजस्थाननं त्यांच्यापुढे १५३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते पार करताना के एल राहुलनं नाबाद ८४ धावांची खेळी केली. या विजयानंतर पंजाबचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्यांनी ९ पैकी ६ सामने जिंकलेत. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये धडक मारण्याची नामी संधी त्यांच्याकडे आहे. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये हैदराबाद आणि मुंबईनं पंजाबचा पराभव केला होता. या पराभवांमुळे निराश, अस्वस्थ झालेल्या प्रीतीनं इंदूरच्या प्रसिद्ध गणपती मंदिरात जाऊन विजयासाठी साकडं घातलं होतं. तिच्या हाकेला बाप्पा धावला.