नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉ याने पृथ्वी शॉ याची नेत्रदीपक फलंदाजी पाहिली. या खेळीनंतर पृथ्वी हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, असे त्याचे कौतुक केले आहे. पृथ्वीच्या फलंदाजीचे तंत्र हे सचिनसारखेच आहे, असे सांगायलाही मार्क विसरला नाही." पृथ्वीची ग्रीप पाहिली किंवा त्याची फलंदाजीला उभी राहण्याची पद्धत पाहिली तर ती सचिनसारखीच आहे. पृथ्वीचे फलंदाजीचे तंत्र पाहिल्यावर मला सचिनची आठवण होते. पृथ्वीचे तंत्र हे एवढे घोटीव आहे की, तो मैदानात कुठेही फटके मारू शकतो. पृथ्वीच्या फलंदाजीचा पाया हा भक्कम आहे. त्यामुळे कोणत्याही चेंडूचा तो समर्थपणे सामना करू शकतो, " असे मार्कने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना पृथ्वीने चार सामन्यांमध्ये 140 धावा केल्या आहेत. या चार सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 166.66 एवढा आहे. पृथ्वीची बुधवारी राजस्थानविरुद्धची 47 धावांची खेळी ही नजरेचे पारणे फेडणारी होती. आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात पृथ्वीने अर्धशतक पूर्ण केले होते.