बेंगळुरूः रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं आयपीएल-११ मधील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे हा पराभव त्यांना कायमच लक्षात राहील. पण या सामन्यात, लक्षात राहू नये असा एक पराक्रम त्यांच्याकडून घडला आहे. तो म्हणजे, त्यांनी फक्त २ चेंडूत २६ धावांची खिरापत वाटली.
मुंबईच्या १०व्या षटकात रॉयल चॅलेंजर्सचा स्फोटक फलंदाज ब्रॅण्डन मॅकलमने हार्दिक पंड्याच्या एका चेंडूवर षटकार ठोकला. तो 'नो बॉल' असल्यानं बेंगलोरला 'फ्री हिट' मिळाली. तो चेंडूही त्यानं हवेतून सीमेपार धाडला. म्हणजेच एका चेंडूवर त्यांना १३ धावा मिळाल्या.
याच प्रकाराची पुनरावृत्ती २०व्या षटकात झाली. १९.५ षटकांत बेंगलोरच्या १५४ धावा होत्या. मिचेल मॅक्लेनघनचा शेवटचा एकच चेंडू शिल्लक असल्यानं, त्यावर षटकार मारला तरी ते फार तर १६० धावांपर्यंत पोहोचतील, असं गणित सगळ्यांनीच मांडलं होतं. पण, 'नो बॉल'वर एक आणि 'फ्री हिट'वर एक अशा १३ धावा कॉलिन डि ग्रँडहोमनं वसूल केल्या आणि रॉयल चॅलेंजर्सला १६७ धावांपर्यंत नेलं.
या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबईला ७ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. १४ धावांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे २ चेंडूतील या २६ धावा त्यांना किती महागात पडल्या, हे वेगळं सांगायची गरज नाही. मुंबईला आता प्ले-ऑफमध्ये खेळायचं असेल तर त्यांना उर्वरित सर्व सहा सामने चांगल्या सरासरीने जिंकावे लागणार आहेत.