चेन्नई : संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब षटकार खेचून करायचे, हे खास शैली आहे ती महेंद्रसिंग धोनीची. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये षटकार खेचत त्याने संघाला बरेच विजय मिळवून दिले आहेत. विश्वविजयही त्याने षटकार खेचतच मिळवून दिला होता, पण आता ट्वेन्टी-20 सामन्यांमध्येही तो षटकार खेचत संघाला विजय मिळवून देत आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये आयपीएलचा सामना रंगला होता. या सामन्यात षटकार खेचत धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला होता. हा षटकार लगावत धोनीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलमध्ये पाचव्यांदा धोनीने षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा डाव 153 धावांत आटोपला होता. चेन्नईने 159 धावा करत हा सामना जिंकला. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला आणि पंजाबचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्याच्या 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार लगावला आणि चेन्नईला विजय मिळवून दिला.