मुंबई : आयपीएलच्या अकराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पण आतापर्यंतच्या आयपीएलमधला सर्वात श्रीमंत खेळाडू कोण हे तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत आयपीएलच्या लिलावात सर्वात जास्त भाव कोणाला मिळाला, याचा अंदाज आता तुम्ही घेत असाल. पण ' या ' धनाढ्य खेळाडूला मिळालेला आतापर्यंतचा भाव तुम्हाला कदाचित माहिती नसेल.
आयपीएलच्या अकरा हंगामांमध्ये संघ मालकांनी आतापर्यंत 4,284 कोटी रुपये खर्च केले आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 694 खेळाडूंबरोबर करार झाला आहे. आयपीएलच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात, याची मोजणी ‘मनीबॉल’ नावाची कंपनी करत आहे. या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे आणि त्यानुसार आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले, हे समोर आले आहे.
‘मनीबॉल’ या कंपनीच्या अहवालानुसार आयपीएलमध्ये सर्वात धनाढ्य ठरला आहे तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आयपीएलमध्ये आतापर्यंत धोनीने एकूण 107.84 कोटी रुपये एवढी रक्कम कमावली आहे. धोनीनंतर या यादीत दुसरा क्रमांक लागतो तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 101.60 रुपये कोटी कमावले आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 94.62 कोटी रुपये कमावले असून तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा भारताचा कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत 92.20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर या यादीत पाचव्या क्रमांकावर युवराज सिंग आहे. युवराजला आतापर्यंत 83.60 कोटी एवढी राशी मिळाली आहे. चेन्नईच्या सुरेश रैनाने आतापर्यंत 77.74 कोटी रुपये कमावले आहेत.