मुंबईः क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असणाऱ्या आणि कोलकात्याला आयपीएलचं जेतेपदही मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरनं दिल्ली डेअरडेविल्सचं कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दिल्ली डेअरडेविल्सच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचं त्यानं प्रांजळपणे म्हटलंय. पण, गंभीरचं पायउतार होणं वरवर वाटतं, तितकं साधं नसल्याची शंका अनेकांच्या मनात आहे आणि ते पुराव्यानिशी सिद्धही केलं जाऊ शकतंय.
टीम इंडियाचा 'दादा' कर्णधार म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली आणि 'गब्बर' सलामीवीर शिखर धवन यांना ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांमुळे कर्णधारपद सोडावं लागलं होतं. गौतीच्या राजीनाम्यामागेही तेच कारण असल्याचं बोललं जातंय. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दिल्लीचा प्रशिक्षक आहे. गंभीरच्या 'विकेट'मागे त्याचा अदृश्य हात असू शकतो, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. कारण, आयपीएलच्या सगळ्याच पर्वांमध्ये दिल्लीची कामगिरी यथातथाच राहिलीय. पण, कधी कुणी राजीनामा दिल्याचं ऐकिवात नाही. मग अचानक यावेळीच असं का झालं?, असा प्रश्न विचारला जातोय.
ऑस्ट्रेलिया विजयासाठी वाट्टेल ते करू शकते, हे अनेकदा सिद्ध झालंय. त्यांची कार्यपद्धती वेगळीच आहे. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि भारतीय कर्णधार हे समीकरण कधीच जुळलेलं नाही. ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुलीमधील वाद सर्वश्रुत आहेच, पण २००९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदावरून 'दादा'ला बाजूला करण्यात जॉन बुकॅनन यांची मोठी भूमिका होती. २०१४ मध्ये शिखर धवननं मधेच हैदराबादचं कर्णधारपद सोडलं होतं. तेव्हाही टॉम मुडी यांच्याकडे - अर्थात ऑस्ट्रेलियाच्याच शिलेदाराकडे नजरा रोखल्या गेल्या होत्या. तसंच काहीसं गंभीरच्या बाबतीतही झालं असणार, अशी त्याच्या चाहत्यांना खात्रीच आहे.
रिकी पाँटिंगला पराभव पचवता येत नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना, पराभव दिसू लागताच तो सैरभैर व्हायचा. रडीचा डाव खेळायलाही मागे-पुढे पाहायचा नाही. सततच्या पराभवानंतरच त्याने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडून दिलं होतं. त्यामुळे कुठे तरी पाँटिंगच्या दबावाखालीच गौतीने हा निर्णय घेतला नाही ना, असं बऱ्याच जणांना वाटतंय.
दरम्यान, दिल्ली संघाची मालकी आता दोन कंपन्यांकडे आहे. गेल्याच आठवड्यात जेएसडब्ल्यूने त्यांचे ५० टक्के समभाग विकत घेतलेत. त्यामुळे काही जण या व्यवस्थापकीय बदलाशीही गंभीरच्या राजीनाम्याचा संबंध जोडताहेत.
आयपीएलच्या ११व्या पर्वातील सहा सामन्यात गौतम गंभीरला फक्त ८५ धावा करता आल्यात. सहापैकी पाच सामने गमावल्यानं दिल्ली गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. आता प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी त्यांना उरलेले सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. हे आव्हान श्रेयस अय्यर कसं पेलतो, हे पाहावं लागेल.
Web Title: IPL 2018 is ricky ponting the reason behind gautam gambhir's decision to step down as Delhi skipper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.