नवी दिल्लीः सनरायझर्स हैदराबादच्या धडाकेबाज खेळामुळे दिल्ली डेअरडेविल्सचा शिलेदार ऋषभ पंतचं खणखणीत शतक व्यर्थ ठरलं असलं, तरी नाबाद १२८ धावांची त्याची खेळी अनेक अर्थांनी खास आहे. ऋषभचं शतक हे आयपीएल स्पर्धेतील ५०वं शतक ठरलंय. तसंच, आयपीएलमधील पाच सर्वात मोठ्या खेळींमध्येही त्याच्या या खेळीचा समावेश झाला आहे.
आयपीएल-११ मध्ये दिल्लीची कामगिरी अगदीच यथा-तथा झाली असली, तरी काल त्यांच्या एका वीरानं 'कल्ला' केला. गोलंदाजांची सर्वात तगडी फौज असलेल्या हैदराबादविरुद्ध ऋषभ पंतने धुमशान केलं. चौकार, षटकारांची आतषबाजी करत त्यानं ६३ चेंडूत नाबाद १२८ धावा फटकावल्या. एवढ्या धावा अन्य कुठल्याच भारतीय शिलेदाराला ना आयपीएलमध्ये करता आल्यात, ना टी-२० क्रिकेटमध्ये.
आयपीएलच्या एका सामन्यात तीन फलंदाजांनी ८० हून अधिक धावा केल्यानं एका वेगळ्या विक्रमाचीही नोंद झाली आहे. ऋषभ पंत, शिखर धवन (५० चेंडूत ९२ धावा) आणि केन विल्यमसन (५३ चेंडूत ८३ धावा) हे ते त्रिकूट. विशेष म्हणजे हे तिघंही नाबाद राहिले.
मनीष पांडेनं २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना शतक झळकावलं होतं. तेव्हा त्याचं वय १९ वर्ष २५३ दिवस इतकं होतं. आता त्याच्यानंतर कमी वयाच्या शतकवीरांमध्ये २० वर्षीय ऋषभचा दुसरा नंबर लागतो.
आयपीएलमधील पाच सर्वात मोठ्या खेळी
१. ख्रिस गेलः नाबाद १७५ (२०१३)२. ब्रण्डन मॅकलमः नाबाद १५८ (२००८)३. एबी डिविलियर्सः नाबाद १३३ (२०१५)४. एबी डिविलियर्सः नाबाद १२९ (२०१६)५. ख्रिस गेलः नाबाद १२८ (२०१२) / ऋषभ पंतः नाबाद १२८ (२०१८)
आयपीएलमधील 'माइलस्टोन' शतकं
पहिलं शतकः ब्रॅण्डन मॅकलम (कोलकाता नाइट रायडर्स) - १८ एप्रिल २००८२५वं शतकः शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स) - २२ एप्रिल २०१३ ५०वं शतकः ऋषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स) - १० मे २०१८