ठळक मुद्दे14 सामन्यांमध्ये एखादा सामनाही या मुंबईच्या या दोन खेळाडूंच्या वाट्याला येऊ नये, हा भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईचा अपमान नाही का? आणि तोदेखील मुंबईच्याच खेळाडूने करावा, असे दुर्देव नाही. आदित्य आणि सिद्धेश यांचा दोष तरी काय?
प्रसाद लाड
आयपीएल म्हणजे युवा खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे म्हटले जाते. सध्याच्या घडीला बऱ्याच युवा खेळाडूंना आयपीएलमुळे आपली गुणवत्ता दाखवायची चांगली संधी मिळाली आहे. पण मुंबई इंडियन्स संघात मात्र मुंबईच्याच खेळाडूंची कुचंबणा होत असल्याचे समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईचाच आहे, तर मग त्याच्याकडूनच मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय का केला जातो, हे अनाकनलीय आहे.
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित आणि सूर्यकुमार हे दोन मुंबईचे खेळाडू आहेत. सूर्यकुमार यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स या संघात होता, पण त्याला यावर्षी मुंबईने प्रत्येक सामन्यात संधी दिली. पण आदित्य तरे आणि सिद्धेश लाड या दोन युवा मुंबईच्या खेळाडूंना रोहित संधी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
आतापर्यंत मुंबईचा संघ 12 सामने खेळला. या 12 सामन्यांत त्यांनी यष्टीरक्षकाची जबाबदारी इशान किशनवर सोपवली. या 12 सामन्यात तो फक्त एकाच सामन्यात चांगला खेळला. बाकीच्या 11 सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. त्यावेळी रोहितला मुंबईकर तरेला संधी द्यावीशी वाटली नाही? आदित्यने मुंबईचे नेतृत्व केले आहे, त्याचबरोबर यष्टीरक्षणाची भूमिकाही चोख बजावली आहे. एक फलंदाज म्हणूनही त्याचा लौकिक आहे. तरे आणि किशन या दोघांची तुलना केली तर आदित्यच उजवा ठरतो, तरीही तो संघात नाही, आश्चर्यच आहे. तरेवर हा अन्याय फक्त यावर्षी झालाय, असेही नाही. गेल्या नऊ वर्षांपासून तरेच्या बाबतीत, हीच गोष्ट पाहायला मिळाली आहे. तरेसारख्या मुंबईच्या रणजी कर्णधारावर हा अन्याय का, याचे उत्तर रोहितने द्यायला हवे.
सध्याच्या मोसमात मुंबईची फलंदाजी चांगली झालेली नाही. त्यांना फलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही. कायरन पोलार्ड, जेपी ड्युमिनी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी लय सापडलेली नाही. किशन, दस्तुरखुद्द रोहितही आपली छाप पाडू शकलेला नाही. या परिस्थितीत मुंबईच्या संघासाठी ' संकटमोचक ' ठरलेला सिद्धेश लाड अजूनही बेंचवर बसून आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सिद्धेशची मुंबईकडून खेळताना दमदार कामगिरी झाली आहे. रणजी आणि ट्वेन्टी-20 स्पर्धांमध्येही त्याने छाप पाडली आहे. तरीदेखील त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी नेमके निकष तरी कुठले? याचे उत्तर रोहित शर्माने द्यायला हवे.
प्रत्येक मोसमात जवळपास 14 सामने खेळवले जातात. पण या 14 सामन्यांमध्ये एखादा सामनाही या मुंबईच्या या दोन खेळाडूंच्या वाट्याला येऊ नये, हा भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईचा अपमान नाही का? आणि तोदेखील मुंबईच्याच खेळाडूने करावा, असे दुर्देव नाही. आदित्य आणि सिद्धेश यांचा दोष तरी काय? रोहितचा त्यांच्यावर विश्वास नाही का? प्रत्येक युवा खेळाडूला संधी मिळायला हवीच, पण रोहित मुंबईच्या गुणवान खेळाडूंना तू संधी दिलीच नाहीस, तर त्यांच्या खच्चीकरणाला तूच जबाबदार आहे. आशा आहे की, यापुढे तरी या दोन मुंबईकरांना तू संधी देशील, अन्यथा मुंबईच्या गुणवान खेळाडूंचा मारक, अशी तुझी नवी ओळख व्हायला वेळ लागणार नाही.
Web Title: IPL 2018: Rohit, will give opportunity to Mumbai players?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.