मुंबई : वानखेडेवर रविवारी झालेल्या आयपीएलच्या चौथ्या लढतीत मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 94 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण यासाठी त्याला मदत केली ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनने.
सचिन हा मुंबईच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक आहे. मुंबईच्या खेळाडूंना सचिन नेहमीच मार्गदर्शन करत असतो. पण सचिनचा मुलगा हा वेगवान गोलंदाजीही करतो, त्याचबरोबर तो आयपीएलच्या संघाबरोबरही असतो. मुंबईचा वानखेडेवर चौथा सामना रंगण्यापूर्वी सारेच खेळाडू सराव करत होते. यावेळी रोहितला गोलंदाजी करत होता तो अर्जुन.
नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना फलंदाजांना काही अतिरीक्त गोलंदाजांची मदत लागते. त्यामुळे संघामध्ये नसलेले काही खेळाडू यावेळी गोलंदाजी करत असतात. या अतिरीक्त गोलंदाजांमध्ये अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या चौथ्या सामन्यापूर्वी रोहित सराव करत होता. त्यावेळी अर्जुनने काही षटके रोहितसाठी गोलंदाजी केली. या सरावाचा फायदा रोहितला सामन्यातही झाला. रोहितच्या नेत्रदीपक 94 धावांच्या खेळीवर मुंबईने हा सामना जिंकला. सध्याच्या घडीला मुंबईला पहिला विजय गवसला आहे. आता 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे.