मुंबई : न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली आणि त्यानंतर स्टीव्हन स्मिथला आपले ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद गमवावे लागले. त्यानंतर स्मिथला लगेचच दुसरा धक्काही बसला आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद स्मिथकडे सोपवण्यात आले होते. पण या प्रकरणामुळे राजस्थानच्या संघाने त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. त्याच्याजागी संघाची कमान आता भारताच्या अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे.
दोन वर्षांनी राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे लीगमध्ये पुनरागमन करताना राजस्थानच्या संघाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यामुळेच त्यांनी स्मिथला कर्णधारपदावरून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्यबद्दल कधीच वाद झालेला नाही. त्याचबरोबर तो बरेच वर्ष राजस्थानच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय घडले दक्षिण आफ्रिकेमध्ये...केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.
कारवाई काय झाली...या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामन्याच्या उर्वरीत दोन दिवसांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी यष्टीरक्षक टीम पेनकडे सोपवण्यात आली आहे.